
आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील शहीद जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्यावर बहिरेवाडी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी येथे उपस्थिती दर्शवून शहीद ऋषिकेश यांना साश्रु नयनांनी निरोप दिला. यावेळी ‘भारतमाता की जय’, शाहिद ऋषिकेश, अमर रहे’ आदी घोषणा वातावरणात घुमत होत्या.
काल सायंकाळी ऋषिकेश यांचे पार्थिव चंदीगडहुन पुण्याकडे विमानाने आणण्यात आले. सकाळी साडेसातच्या सुमारास ते बहिरेवाडी येथे विशेष वाहनाने आणण्यात आले. फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून ते जोंधळे कुटुंबीयांच्या घरी नेण्यात आले. येथे सर्वांनी अखेरचे दर्शन घेतले.
भाऊबीज असल्याने बहीण कल्याणी हिने केलेल्या पार्थिवाच्या अखेरच्या ओवाळणीवेळी ‘दाद्या’ म्हणून घातलेल्या सादेने सर्वांना गलबलून सोडले. या दरम्यानचा, जोंधळे कुटुंबीय, नातलग व मित्र परिवाराचा आक्रोश हेलावून सोडणारा होता.
त्यानंतर येथील भैरवनाथ हायस्कूलच्या प्रांगणाकडे मिरवणुकीने पार्थिव नेण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थ, तालुकवासीय नागरिकांनी ऋषीकेशच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला.
अंत्यसंस्कार स्थळी शासकीय रिवाजानुसार सैनिकांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून ऋषिकेश यांना मानवंदना दिली. सैन्यदलातील अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी पार्थिवास पुष्पचक्र वाहिल्यावर हजारोंच्या उपस्थितीत पार्थिवास भडाग्नी देण्यात आला.




























































