सारोळा कासारच्या वीरपुत्राला हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील लष्करी जवान संतोष बाळासाहेब कडूस (39) यांचे लष्करी प्रशिक्षण सुरू असताना बुधवारी सायंकाळी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे निधन झाले होते. शुक्रवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध गावांमधील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

गावच्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गावात सकाळपासून सर्व दैनदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. फुलांनी सजवलेल्या वाहनातून संतोष कडूस यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. नगरच्या आर्मड कोर सेंटरच्या लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर लष्कराचे अधिकारी तसेच माजी खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, निलेश लंके, पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस, सविताताई मोरे, उद्धव अमृते, शिक्षक नेते संजय धामणे, माजी सभापती राम साबळे, कॅप्टन सुभाष ढोरजकर, कॅप्टन ठोकळ, पोपटराव कडूस, प्राचार्य एस.एस.शिंदे आदींनी यावेळी श्रद्धांजली वाहिली.

स्वर्गीय संतोष कडूस हे सन 2001 पासून लष्करात कर्तव्य बजावत होते. त्यांची सेवा पूर्ण झाली होती. मात्र त्यांनी सेवा निवृत्ती न घेता आणखी 5 वर्षे सैन्य दलात सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे अर्ज करून सेवा वाढवून घेतली होती. सध्या त्यांची जम्मू काश्मीर येथे नियुक्ती होती, मात्र सेवा वाढवून घेतल्याने गेल्या 10-12 दिवसांपूर्वीच त्यांना पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेशातील भोपाळ येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर पाठविण्यात आले होते. प्रशिक्षण सुरू असताना बुधवारी (दि.२६) सायंकाळी त्यांना प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आले होते. ही वार्ता रात्री उशिरा कडूस कुटुंबियांना भोपाळ येथील लष्करी अधिकाऱ्यांनी कळविली. ही माहिती गावात कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. कै. संतोष कडूस यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुले, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे.