मांगरुळमधील हुतात्मा स्मारकाची प्रचंड दुरवस्था, विजयस्तंभ कधीही ढासळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिराळा तालुक्यातील मांगरुळ येथील हुतात्मा स्मारकाची दुरवस्था झाली आहे. विजयस्तंभाचे सिमेंट निघून गेले असून, आतील स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे हुतात्म्यांचे स्मरण करून देणारा हा विजयस्तंभ कोणत्याही क्षणी ढासळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्मारकाची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढय़ातील हुताम्यांचे स्मरण राहावे या हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात राज्यभरात 206 हुतात्मा स्मारके उभारण्यात आली. त्यापैकी जिल्ह्यात कापूसखेड, कामेरी, पडवळवाडी, वाळवा, आष्टा, ईश्वरपूर (ता. वाळवा), सांगली, हरिपूर, मालगाव (ता. मिरज), बिळाशी, मांगरुळ, आरळा, मणदूर (ता. शिराळा ) खानापूर, पलूस येथे अशी एकूण 15 स्मारके बांधण्यात आली. गेल्या 34-35 वर्षांत या हुतात्मा स्मारकांच्या देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाबाबत जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या स्मारकांची अक्षरक्षः वाईट अवस्था झाली आहे.

मधल्या काळात हुतात्मा स्मारकांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाने बांधकाम विभागामार्फत थोडय़ाफार प्रमाणात निधी मंजूर केला होता; परंतु या निधीमधून अनेक हुतात्मा स्मारकांची कामे अर्धवटच झालेली दिसत आहेत. त्यानंतर दुसऱया टप्प्यातील निधीसुद्धा मंजूर होऊन आला होता. त्या निधीचे नेमके काय झाले, ते अद्यापि समजू शकलेले नाही. मांगरूळ येथील हुतात्मा स्मारकाची कामे अर्धवटच झाली आहेत. या हुतात्मा स्मारकात सध्या मुलांची शाळा भरते. शिवाय अनेक मुले तेथे खेळत असतात. अनेकवेळा ही मुले विजयस्तंभाच्या खाली व अवतीभोवती फिरत असतात. शिवाय हुतात्मा स्मारकाचा विजयस्तंभ पूर्ण खराब होऊन तो कोणत्याही वेळी पडू शकतो, अशी अवस्था आहे. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्ट 9 ऑगस्टचे झेंडावंदन झाले की इकडे एकही शासकीय अधिकारी ढुंकूनही पाहत नाही. हा विजयस्तंभ दुरुस्त होऊन पुन्हा पूर्ववत व्हावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

जिल्ह्यातील ईश्वरपूरचे स्मारक स्वातंत्र्यसैनिक सन्मान समितीकडे, सांगलीतील स्मारक रोटरीकडे, खानापूरचे शिक्षण प्रसारक मंडळाकडे आहे. उर्वरित स्मारकांची देखभालीची जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडेच आहे. यातील अनेक स्मारकांचे पत्रे-फरशा उखडणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था, अशी सार्वत्रिक अवस्था आहे. अपवाद वगळता ही सर्व स्मारके अवैध व्यवसायांचे दारूडय़ांचे अड्डे बनली आहेत. याबाबत स्वातंत्र्यसैनिकांची एक पिढी हयात होती, तेव्हा वारंवार जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत असे. मात्र, अलीकडे त्यांची संख्याही कमी झाल्याने त्या तक्रारीही आता बंद झाल्या आहेत. प्रशासनाने ही स्मारके योग्य सामाजिक संस्थांच्या हाती सोपवून त्यांचा विधायक वापर व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.