
संगमनेर शहरापासून जवळ असलेल्या सुकेवाडीत आज सकाळी पोलिसांनी गुप्त पथकाच्या मदतीने कारवाई करत तब्बल 456 किलो गांजा जप्त केला. संगमनेर शहरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याची किंमत 1 कोटी 14 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी उत्तम पडवळ (रा. सुकेवाडी, संगमनेर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा मुलगा तुषार उत्तम पडवळ हा फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
सुकेवाडी येथील उत्तम पडवळ याच्या घरात गांजाचा मोठा साठा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने विशेष पथक तयार केले.
पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यात घरातील आतल्या खोलीत तसेच एका छोटय़ा वाहनामध्ये पोत्यांमध्ये भरलेला गांजाचा मोठा साठा आढळून आला. याच्या मागे कोणत्या गांजा किंगचा हात आहे, याचा तपास ‘एनटीएफएम’चे उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील करीत आहे. ऑपरेशनमध्ये नाशिक, मुंबई, अहिल्यानगर, पुणे येथील विशेष पथकांचाही समावेश होता. एका सामान्य नागरिकाकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात गांजा आढळल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एएनटीएफ कृती विभाग नाशिक एसीपी गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, एपीआय भागवत व्यवहारे, एपीआय पंकज खरे, पोलीस हवालदार विश्वास अर्जुन बेरड, गणेश दामले, गणेश नंदकुमार मिसाळ, वैभव पांढरे, प्रशांत देशमुख, भास्कर चव्हाण, गणेश जगन्नाथ माळी यांनी ही धडक कारवाई केली.



























































