अयोध्येतील राजघाटावर महायज्ञ दरम्यान भीषण आग, उत्तर प्रदेश सरकारमधील परिवहन मंत्र्यांकडून यज्ञाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या येथील राजघाटावर सुरू असलेल्या श्री लक्ष्मी नारायण महायज्ञात भीषण आग लागण्याची घटना घडली. आग लागताक्षणी लगेचच अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी जियार जी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्री लक्ष्मी नारायण महायज्ञ आयोजित करण्यात आला होता आणि काल या महायज्ञाची सांगता झाली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या येथील राजघाटावर आयोजित श्री लक्ष्मी नारायण महायज्ञाचे आयोजन उत्तर प्रदेश सरकारचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. आज लक्ष्मी नारायण महायज्ञाची सांगता झाली, तेव्हा यज्ञाच्या सांगता समारंभादरम्यान भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांची हानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या आगीत ३-४ जण भाजले असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. भाजलेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १०८-कुंड महायज्ञाच्या सांगता समारंभादरम्यान तीन ठिकाणी भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.

परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या लक्ष्मी नारायण महायज्ञाच्या सांगता समारंभा दरम्यान, आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर घटनास्थळी घबराट पसरली आणि प्रशासनाने घटनास्थळ रिकामे केले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, यज्ञ सुरु असताना जोरदार वाऱ्यामुळे एका ठिणगीने आग लागली.