पहिल्या महिला महामंडलेश्वर, जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या प्रमुख माता गीता भारती यांचे निधन

देशभरातील अनेकांचे धार्मिक गुरु आणि पहिल्या महिला महामंडलेश्वर, जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखा माँ गीता भारती उर्फ संतोषी पुरी माता यांचे अहमदाबाद येथे निधन झाले आहे. त्या 85 वर्षं वयाचे असून त्यांच्यावर धार्मिक पद्धतीने अहमदाबाद येथे मंगळवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

माँ गीता भारती उर्फ संतोषी पुरी यांचा जन्म हरिव्दार येथे झाला होता. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना गीता भारती ही पदवी बहाल केली होती. देश-विदेशात माता गीता भारती यांचे लाखो अनुयायी आहेत. सोलापुरात गीता भारती यांचे तब्बल 65 हजारांहून अधिक भक्त असून त्यांना गीता भआरती यांनी दीक्षा दिली आहे. देशभरात होणाऱ्या कुंभमेळ्यात त्यांना मानाचे स्थान आहे. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळाव्यात गंगापुजनाचा मान पहिला महिला महामंडलेश्वर आखाडा शाहीस्नानात गीता भारती माताजी यांना मिळाला होता.

परमपूज्य गीता भारती यांच्या निधनामुळे देशभरातील गीता भारती यांच्या अनुयायांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अहमदाबाद येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गीता भारती यांच्या पश्चात जुनी पंचायती निर्वाणी आखाड्याच्या उत्तराधिकारी म्हणून माता प्रज्ञा पुरी यांची निवड करण्यात आली आहे.