मातंग समाज संतापला, नांदेडमध्ये सरकारविरोधात आक्रोश मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

राज्यातील मातंग समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेले अत्याचार व अन्यायाच्या विरुद्ध आज मातंग समाज आक्रोश समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. नवामोंढा भागातून निघालेल्या विराट मोर्चात हजारो समाज बांधव तसेच पाठिंबा दिलेल्या विविध संघटनांचा समावेश होता.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावी मातंग समाजाच्या दोन मुलांवर अत्याचार करुन त्यांना मारहाण करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडी ता.उदगीर येथे मातंग समाजाचा नवरदेव मारोती मंदिराच्या दर्शनासाठी आला असताना नवरदेवासह महिला व पुरुषांवर अमानवी हल्ला करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील बामणी तालुका मुखेड येथे ग्रामपंचायत सदस्य दशरथ वाघमारे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले नाही म्हणून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हमालपूरा नांदेड येथील लहुजी साळवे यांच्या कमानीच्या वादातून संदीप जाधव याचा निर्घृण खून करण्यात आला. रेणापूर तालुका लातूर येथील निवाडा गावातील झालेली मातंग समाजाच्या कार्यकत्र्यांना मारहाण, भिमा-कोरेगाव प्रकरणातील मुख्य साथीदार मातंग कन्या कु. पुजा सकट हिचा खून करुन तिचे प्रेत विहिरीत फेकण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील विठ्ठल वाघ यांची झालेली हत्या असे अनेक प्रकार होत आहेत. मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज मातंग समाज आक्रोश समितीच्या वतीने नवामोंढा भागातून दुपारी एक वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध असो, जय लहुजी, अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, अन्याय सहन करणार नाही, अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आदी घोषणांनी आज नांदेडचा परिसर दुमदुमून गेला. अण्णाभाऊ साठे चौक, महात्मा फुले चौक, शिवाजीनगर, दादरा, कलामंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहंचला. या मोर्चाचे नेतृत्व लोकस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे, सतीश कावडे, उत्तम बाभळे, सुरेंद्र घोडजकर, शंकर वाघमारे, लोकस्वराज्य आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, मारोती वाडेकर, लालबा घाटे, आनंदा गुंडिले, उमेश पवळे, गणेश तादलापूरकर, सुनील मोघे, संजय गोटमुकले, एन.जी. कांबळे, सुग्रीव वाघमारे, गंगाधर जाधव, शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक उमरेकर आदी सहभागी झाले होते. या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. हातात वेगवेगळे फलक तसेच शिस्तीमध्ये हा मोर्चा निघाला होता. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर याठिकाणी विविध मान्यवरांनी मातंग समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल संताप व्यक्त करुन दोषींवर कडक कारवाई करावी व त्यांना शासन करावे, अशा भावना व्यक्त केल्या.