
सामना प्रतिनिधी । कर्जत
आजपासून माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर. नेरळ – माथेरान टॉय ट्रेनला आता आकर्षक रंगाचे आणि निसर्गचित्र पेंटिंग केलेले डब्बे जोडण्यात आलेत. माथेरानच्या राणीला नवा साज लाभला असून या मुळे माथेरानच्या राणीचा नूरच पालटला आहे. गेले अनेक दिवस माथेरानची राणी नव्य रूपात येणार अशी जी चर्चा होती ती आता पूर्ण झाली असून माथेरानच्या राणीचा नवा लुक पर्यटकांना आकर्षित करणारा असल्याचे माथेरानवासीयांमध्ये विश्वास आहे.
आज सकाळी पावणे सात वाजता नेरळवरून माथेरानच्या दिशेने निघालेली माथेरानची राणी नवा साज ल्यायलेली होती. या नवीन डब्यांमुळे या गाडी विषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पावसाळ्यात दरवर्षी प्रमाणे माथेरानची ट्रेन १५ जून ला बंद होऊन १६ ऑक्टोबरला चालू होण्याचा शिरस्ता आहे. यावर्षी नव्या लुकमध्ये ही गाडी चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार होता परंतु रेल्वे ट्रॅक वरील कामे वेळेत पूर्ण न झाल्याने ही नवीन लुकमधील गाडी धावण्यास उशीर झाला.
दोन इंजिने यापूर्वीच मिनीट्रेनच्या ताफ्यात असून तिसरे इंजिनही नेरळ स्थानकात दाखल झाले आहे. त्यामुळे पर्यटन हंगामात अमन लॉज-माथेरान या शटल सेवेबरोबर नेरळ-माथेरान-नेरळ या मार्गावरील पर्यटन हंगामही फुल्ल व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिनीट्रेनचा प्रवास पर्यटकांना आनंद देणारा ठरावा यासाठी प्रवासी डब्बे आकर्षक करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पारदर्शक छत असलेले प्रवासी डब्बे तयार केले आहेत. त्या डब्यातून प्रवास करताना मिनीट्रेनच्या मार्गावरील वेडीवाकडी वळणे, दऱ्या-खोऱ्या अनुभवता येणार आहेत. दुसरीकडे या पारदर्शक प्रवासी डब्यांवर माथेरान मधील रस्त्यावर चालणारे घोडे, जंगलातील पक्षी-प्राणी, प्रेक्षणीय स्थळे, बाजारपेठ, यांची चित्रे रेखाटली आहेत. माथेरानच्या वैभवाच्या खाणाखुणा अंगावर मिरवीत डोंगरदऱ्यातून धावणारी ही मिनीट्रेन पर्यटकांना आता अधिक आकर्षित करणार आहे.






























































