लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या उमेदवाराचा मायावतींकडून प्रचार

18

सामना ऑनलाईन । लखनौ

लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर फरार झालेला बसपाचा उमेदवार अतुल राय याचा बसपा अध्यक्ष मायावती व सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी प्रचार केला. तसेच राय याच्या गैरहजेरीत त्याचा दणदणीत प्रचार करण्याचे आदेश देखील मायावती यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशानंतर बसपाचे कार्यकर्ते घोसी मतदारसंघात अतुल राय याचा प्रचार करत आहेत.

अतुल राय हा बसपाच्या तिकीटावर उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील घोसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राय याच्यावर 1 मे रोजी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. त्याच्याविरोधात वाराणसीतील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर अतुल राय हा अटकेच्या भीतीने फरार झाला असून तो मलेशियाला गेला असल्याचे बोलले जात आहे. राय विरोधात वरिष्ठ पोलीस अधिक्षक आनंद कुलकर्णी यांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे.

दरम्यान बुधवारी मायावती व सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी घोसी मतदारसंघात सभा घेत मतदारांना अतुल राय यांना मत देण्याचे आव्हान केले. तसेच बसपा सपा कार्यकर्ते देखील घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या