नरेंद्र मोदींच्या काळात देशात भीतीचे वातावरण, वाढदिवशी मायावती यांचा हल्लाबोल

394

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात गरिबी, बेरोजगारी वाढली असून भीती आणि तणावाचे वातावरण पसरल्याचे सांगत बसपा प्रमुख मायावती यांनी बुधवारी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सध्याच्या काळात गरीब लोक, आदिवासी, मुस्लिम बांधव आणि अन्य अल्पसंख्याक सर्वात जास्त संकटात सापडले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मायावती यांचा 64वा वाढदिवस बुधवारी साजरा होत आहे. याच निमित्ताने त्यांनी लखनौमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.

आपल्या वाढदिवशी कार्यालयात समर्थक आणि पत्रकार यांना संबोधित करताना त्या पुढे म्हणाल्या की, भाजप सरकार आपल्या स्वार्थासाठी घाणेरडे राजकारण करत पदांचा दुरुपयोग करीत आहे. केंद्र सरकारची सध्याची सर्वच धोरणे चुकीची आहेत. त्यामुळेच देशात गरिबी, भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. आधीच्या काँग्रेस सरकारप्रमाणेच भाजपनेही जनतेचे हित बासनात गुंडाळून ठेवले आहे. यामुळे देशात अराजकता आणि तणाव पसरला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या