‘मुसलमानांनो आम्हालाच मतं द्या’, मायावतींच्या आवाहनाची निवडणूक आयोगाने घेतली दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती निवडणूक प्रचारादरम्यान देवबंद येथे केलेल्या भाषणामुळे अडचणीत आल्या आहेत. मायावती यांनी येथे मुसलमानांनी एकजूट होऊन सपा, बसपा आणि राष्ट्रीय लोकदल महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले. यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे.

रविवारी सहारनपूर, देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदची पहिलीची संयुक्त प्रचारसभा झाली. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. याच दरम्यान, मी खास मुसलमान समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे’, असे वक्तव्य मायावती यांनी केले. धर्माच्या आणि जातीच्या आधारवर मतदान करण्याचे आवाहन हे अग्राह्य मानले जाते व आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते, त्यामुळे मायावती या अडचणीत आल्या असून निवडणूक आयोगाने याची दखल घेत अहवाल मागवला आहे.

काँग्रेसवर निशाणा
मायावती यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसवर गंभीर आरोप केला. काँग्रेसने विशिष्ट समाजाच्या लोकांना तिकीट दिले आहे. आपण जिंकू किंवा पराभूत होऊ पण महाआघाडीला फायदा होऊ नये ही काँग्रेसची नीती असल्याचा आरोप मायावती यांनी केला. त्यामुळे काँग्रेसने अशा जाती व धर्माच्या लोकांना तिकीट दिले ज्याचा थेट फायदा भाजपला होईल, असेही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशमध्ये 80 लोकसभा जागा असून 7 टप्प्यात येथे निवडणुका होतील. यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला पार पडणार असून त्यापूर्वी प्रचार शिगेला पोहोचल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदुस्थानी लष्कराला मोदींची सेना असे म्हटल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप घेत त्यांना नोटीस पाठवत खुलासा करण्यास सांगितले होते.