सत्तेत असताना भाजपचा ‘टिपू सुलतान’ नावाला पाठिंबा, महापौरांकडून पुराव्यासह खोटेपणाची पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेत 2013 मध्ये सत्तेत असताना एम/पूर्व गोवंडी येथील एका रस्त्याला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यास पाठिंबा देणाऱया भाजपने आता केवळ राजकारण करण्यासाठीच ‘नामकरणावरून’ आगपाखड सुरू केल्याचे सांगत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा खोटेपणा उघड केला. 2013 मध्ये स्थापत्य समितीत मंजुरीसाठी मांडलेल्या आणि भाजपचा पाठिंबा असलेल्या प्रस्तावाची प्रतच महापौरांनी सादर करून भाजप नाहक खोटेपणा करीत असल्याचा आरोप केला.

गोवंडी साहीनाका डंपिंग ग्राऊंड येथील एका उद्यानाला ‘टिपू सुलतान’ नाव देण्यावरून गुरुवारी झालेल्या बाजार उद्यान समितीच्या बैठकीत भाजपने प्रचंड गोंधळ घातला. संबंधित उद्यानाचे काम अपूर्ण असल्यामुळे माहिती मागवून प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवल्याचे बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी जाहीर करूनही भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन

भाजपचा खोटेपणा उघड केला.
शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. असे असताना भाजप शिवसेनेला बदनाम करण्यासाठी या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक रंग देत आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच पाठिंब्याने मुंबईत या आधीही काही ठिकाणी ‘टिपू सुलतान’ नाव देण्यात आले आहे.
– किशोरी पेडणेकर, महापौर