
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे महापौरांचे निवासस्थान आता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानातील बंगल्यात हलवण्यात आले आहे. विद्यमान महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज नव्या निवासस्थानात सपत्नीक गृहप्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात होणार आहे. त्याकरिता बंगल्याची जागा स्मारक ट्रस्टला नुकतीच हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने जिजामाता उद्यानातील बंगल्यात महापौरांसाठी अधिकृत निवासस्थान तयार करण्यात आले आहे. येत्या 23 जानेवारीला शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी स्मारकाच्या वास्तूचे पूजन होणार आहे. त्यामुळे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज पत्नी पूजा महाडेश्वर यांच्यासह नवीन बंगल्यात गृहप्रवेश केला. याप्रसंगी बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हाजी मो. हलीम खान तसेच स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे उपस्थित होते. महापौरांच्या स्वागतासाठी विभागात पताके आणि झेंडे फडकवण्यात आले होते.
असा आहे नवा बंगला
सन 1931 मध्ये ब्रिटिशांनी मौजमजेसाठी उद्यानात हा बंगला बांधला. त्यात कॅफेटेरिया होता. सन 1974 पासून प्रशासकीय अधिकाऱयांचे निवासस्थान म्हणून हा बंगला वापरात आहे. 17,000 चौरस फुटांचा या बंगल्याचा परिसर असून 6000 चौरस फुटांचे बांधकाम आहे. एक मजली बंगल्यात आठ खोल्या आहेत.
महापौरांचा नवीन पत्ता
महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर,
ई. एस. पाटणवाला मार्ग, वीर जिजामाता उद्यान,
भायखळा, (पूर्व),
मुंबई – 400 027.



























































