
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली आहे. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांचेही हाल सायरस मिस्त्रीसारखे होतील, अशी धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली, परंतु पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत धमकी देणाऱया तरुणाला शोधून काढले.
रतन टाटांच्या सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी एक विशेष पथक नेमण्यात आले होते, तर इतर टीमला या कॉलरपर्यंत पोहोचण्याचे आव्हान देण्यात आले होते. पोलिसांनी तांत्रिक सहाय्याने आणि मोबाईल फोन कंपन्यांच्या मदतीने कॉलरचा माग काढला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकात असल्याचे आढळले. तसेच तो पुण्याचा रहिवासी असल्याचेही पोलिसांना समजले. पोलिसांनी पुण्यातील निवासस्थानी धाड मारली, परंतु तो तिथेही सापडला नाही. तसेच गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात केली होती. त्याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असताना संबंधित कॉलरला स्किझोफ्रेनिया असल्याचे समजले. तो उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.































































