
आरसीएफ आणि परिमंडळ सहाच्या एटीसीने संयुक्त कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्याच्याकडून तेरा कोटींचे एमडी ड्रग जप्त केले. एकाला पोलीस कोठडी, तर चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत ड्रगची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर कारवाईसाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी रेहान शेखला ताब्यात घेऊन त्याच्याकडून साडेचार लाखांचे एमडी जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी रेहानच्या तीन साथीदारांना मुंबई आणि नवी मुंबई येथून बेड्या ठोकल्या. त्यानंतर पोलिसांनी एका मुख्य आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांनी तिन्ही कारवाईत एकूण 6 किलो 688 ग्रॅम एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची किंमत सुमारे 13 कोटी 37 लाख रुपये इतकी आहे.