
कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटर आपले छान हसून स्वागत करतात. त्यानंतर आपल्यापुढे मेन्यू कार्ड सरकवत जेवणाची ऑर्डर घेतात. देशातील बहुतेक हॉटेलमध्ये वर्षानुवर्षे हेच चित्र पाहायला मिळते. आंध्र प्रदेशातील एका हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या ग्राहकांना मात्र काहीसा वेगळा अनुभव येतोय. इथे ऑर्डर घेण्यापासून ते जेवण पोहोचवण्यापर्यंतची सर्व कामे चक्क दोन रोबोट करतायत. कोरोना काळात कॉण्टॅक्टलेस सेवेसाठी हॉटेल मालकांनी ही नामी शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे हे रोबोट पाहण्यासाठी ग्राहकांची खासकरून बच्चे कंपनीची हॉटेलमध्ये गर्दी वाढतेय.
कोरोनाचा मोठा फटका हॉटेल आणि टुरिझम क्षेत्राला बसला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलमालक विविध शक्कल लढवताना दिसतायत. यातच एक पाऊल पुढे टाकत विजयवाडा येथील एका हॉटेल मालकाने हायटेक पाऊल उचलले आहे. आजवर आपण सिनेमांत रोबोटला वेगवेगळी कामे करताना पाहिले आहे. इथे मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना तो अनुभव घेता येतोय.
याबाबत हॉटेलचे व्यवस्थापक नागेश म्हणाले, ‘‘कोरोना काळात कॉण्टॅक्टलेस सेवेसाठी आमच्या हॉटेलमध्ये दोन रोबोट आहेत. या रोबोटवर पुढच्या बाजूला एक डिस्प्ले आहे, त्यावर ग्राहक आपली ऑर्डर देऊ शकतात. रोबोट पाहण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.’’ यापूर्वी चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये रोबोटद्वारे सेवा देण्याचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. या हॉटेलमध्ये चार रोबोट जेवण वाढण्याचे करण्याचे काम करत आहेत.


























































