दररोज दीडशे ‘गोवर कॅम्प’, रुग्णवाढ कायम; पालिका अलर्ट; सर्वेक्षण, तपासणी, उपचार आणि खबरदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गोवर रुग्णांची संख्या वाढतच असल्याने पालिका अलर्ट मोडवर आहे. कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी झोपडपट्टी भागासह मुंबईभरात दररोज 150 तपासणी-सर्वेक्षण कॅम्प घेतले जाणार असून उपचार आणि खबरदारी घेतली जाणार आहे. याबाबत कार्यवाही करण्यासाठी विभागवार निर्देश दिल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

मुंबईत गोवरची साथ झपाटय़ाने पसरत असून गोवर प्रतिबंधात्मक लस न घेतलेली मुले बाधित होत आहेत. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 20 हजारांहून अधिक मुलांनी गोवर प्रतिबंधात्मक न घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 0 ते 15 वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण करण्यात येत असून आतापर्यंत 15 हजार मुलांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

2020-21 च्या तुलनेत 2022 मध्ये गोवर आजाराचा संसर्ग वाढला आहे. पालिकेच्या अखत्यारीतील 24 वॉर्डांपैकी 8 वॉर्ड गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. यामध्ये भायखळा, वडाळा, धारावी, गोवंडी, चेंबूर, कुर्ला, मालाड, वांद्रे या वॉर्डांत गोवर रुग्णांची संख्या वाढल्याने हे वॉर्ड ‘गोवर हॉटस्पॉट’ ठरले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी दररोज सुमारे 100 पॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. ही संख्या दररोज 150 पर्यंत वाढवण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

मुंबईत गोवर संशयितांची संख्या तीन हजार पार
मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढतच असून गोवर संशयितांची संख्या तीन हजार पार गेली आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 184 रुग्णांची तर 3036 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा गोवरने मृत्यू झाला आहे. तर 73 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 9 रुग्ण ऑक्सीजनवर 2 रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत.

मुंबईत गोवर संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 26 लाख 27 हजार 667 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले 3036 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे 184 रुग्ण आढळले. त्यापैकी 73 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. 62 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. 9 रुग्ण ऑक्सिजनवर तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात 15 हजार 009 मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.