मुंबईत दिवसभरात आठ गोवरबाधित, एकूण रुग्णांची संख्या 260 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत दिवसभरात आठ गोवरबाधितांचे निदान झाले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 260 वर पोहोचली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन पालिका प्रशासनाकडून  करण्यात आले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात गोवरमुळे आतापर्यंत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गोवरची कोणतीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, मुंबईत  दिवसभरात 136 संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयित रुग्णांची संख्या 3,831 वर पोहोचली आहे. मुंबईत झोपडपट्टी भागात गोवरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये गोवंडी, चेंबूर, भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळत आहेत.

पालिकेकडून 48 लाख घरांचे सर्वेक्षण

आज वरळी, मालाड, कांदिवली, कुर्ला  व घाटकोपर अशा ठिकाणी 8 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोवरच्या पार्श्वभूमीवर पालिकेने आतापर्यंत 48 लाख 73 हजार 736 घरांचे सर्वेक्षण केले आहे. या ठिकाणी आवश्यकतेनुसार लसीकरण, ‘अ’ जीवनसत्त्व गोळय़ांचे वाटप करण्यात येत आहे.