
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामामध्ये चिपळूण तालुक्यातील पेढे-परशुराम येथील संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्यापही प्रलंबित असून तो त्वरित मिळावा यामागणीसाठी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत व आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नांने पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यापूर्वीही आमदार सदानंद चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधीमंडळ सभागृहात चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी महसूल मंत्री यांनी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे मंत्रालय मुंबई येथे यापूर्वी बैठक घेण्यात आली होती. मोबदला वाटपासाठी 90:10 सूत्र मान्य करण्यात आले होते. परंतु अद्यापही पुढील कार्यवाही झालेली नव्हती. म्हणून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांची नुकतीच भेट घेऊन या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. त्याप्रमाणे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने आज मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये सविस्तर चर्चा घडून आली. खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण व आमदार प्रसाद लाड यांनी देवस्थान, वहिवाटदार व कुळ यांच्या प्रश्नांची सविस्तर मांडणी सादर करत तातडीने मोबदला वाटप करण्याची मागणी केली.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासकीय अधिकारी यांना सक्त सूचना देत देवस्थान, वहीवाटदार व कुळ असेल त्याठिकाणी देवस्थान 10 टक्के वहिवाटदार 10 टक्के व कुळांना 80 टक्के तसेच ज्याठिकाणी फक्त देवस्थान व कुळ आहे त्याठिकाणी देवस्थान 10 टक्के कुळांना 90 टक्के मोबदला तातडीने अदा होणेच्या द्रुष्टीने खास बाब म्हणून न्यायालयासमोर सादर करणेची कार्यवाही जिल्हाधिकारी यांनी करणेचे आदेश दिले. तसेच न्यायालयाचा निर्णय लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले. देवस्थानच्या वतीने उपस्थित असलेले राजू जोशी, अभय सहस्त्रबुद्धे, वारे गुरुजी यांनीही सदर प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच पावसाळा हंगामात पेढे परशुराम हद्दीतील महामार्गाचे कोणतेही काम न करण्याचे तसेच बांधकामे न पाडण्याचे निर्देशही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले. खासदार विनायक राऊत यांनी महामार्ग कामाचे ठेकेदार कंपनी यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत कामाला गती मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रसाद लाड, महसूल अप्पर मुख्य सचिव, सचिव (वने), जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पेढे परशुराम कृती समितीचे अध्यक्ष जनार्दन मालवणकर, परशुराम देवस्थान ट्रस्टचे राजू जोशी व पदाधिकारी, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, अभय सहस्त्रबुद्धे, पेढे सरपंच प्रविण पाकळे, शिवसेना शहर सचिव संतोष (पप्पू) महाडिक, माजी सरपंचदिपक मोरे, पडवेकर आदी उपस्थित होते.
























































