
गेल्या बुधवारी गुन्हे शाखेने कुर्ल्यात एका तरुणाला साडे चार कोटी किमतीच्या तीन हजार किलो एमडी ड्रग्जच्या साठय़ासह पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात वेगळेच प्रकरण समोर आले आहे. वर्चस्वाच्या वादातून मुख्य आरोपीने मावस भावाला ड्रग्जच्या गुह्यात फसवण्यासाठी खड्डा खणला होता. पण भावाला लटकवण्याच्या नादात तोच मेव्हण्याला घेऊन त्यात अडकला, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
गुन्हे शाखा युनीट-5च्या पथकाने गेल्या बुधवारी धारावीत राहणाऱया शिरीष धडके याला तीन किलो एमडीसह कुर्ल्यात रंगेहाथ पकडले होते. इतक्या मोठय़ा प्रमाणात एमडी साठा पकडल्यानंतर ते कुठून आणले याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला. शिरीषची चौकशी केली असता शिरीषचा मेव्हणा दिलीप खरटमोल याचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी वांदय़ात राहणाऱया खरटमोल याला पकडले. खरटमोल याने बायो डिझेलच्या व्यवसायातून त्याने चांगलीच माया जमवली. त्याचा मावस भाऊ दत्ता याच्यासोबत आधीपासूनच वर्चस्वाचा वाद होता. सिमेंटचा व्यवसाय करणाऱया भावाला वरचढ होऊ द्यायचे नाही, अशी खदखद खरटमोलची होती. त्यामुळे खरटमोलने भावाला ड्रग्जच्या गुह्यात अडकविण्याचा कट रचला.
मेव्हण्याला हाताशी घेतले
दहावीपर्यंत शिकलेल्या खरटमोल यू-टय़ूबवर एमडी कसे बनवायचे ते शिकला. मग त्याआधारे त्याने तीन हजार किलो एमडी बनवले. खरटमोलने त्याचा मेव्हणा शिरीषकडे एमडी ड्रग्ज असलेली पिशवी देऊन ती मावस भाऊ दत्ताच्या गाडीत ठेवण्यास सांगितले. पण हा गेम फसला आणि शिरीषबरोबर खरटमोल पकडला गेला. खरटमोलच्या नातेवाईकाकडून ड्रग्जची माहिती पोलिसांच्या खबऱयाला मिळाली. त्यामुळे खरटमोलचा डाव फसला.

































































