Megablock – रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांकरीता मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर लाईनवर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील; तसेच त्या आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर वळवल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या अप मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेवर वळवल्या जातील.

ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यानच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील. पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 या वेळेत ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.