दीड वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी जोडप्याला अटक

दीड वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी जोडप्याला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. राजेश राणा आणि रिंकी राजेश राणा अशी त्या दोघांची नावे आहेत. राणाने मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार पोलीस ठाण्यात केली होती.

राणा आणि रिंकी हे मूळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. चार महिन्यांपूर्वी ते त्याच्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन जोगेश्वरी परिसरात राहू लागले.  दोन दिवसांपूर्वी राणाने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपण मुलाला रिक्षातून घेऊन जात असताना दोन जण आले. त्यांनी बेशुद्ध करून आपल्या मुलाचे अपहरण केले अशी माहिती पोलिसांना दिली. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक उमेश मचिंदर यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सुधीर घाडगे, आनंद भगत, उपनिरीक्षक वर्षा ठुले, ठापूर, शेख, वरठा आदींच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता राणा हा खोटी माहिती देत असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी राणाची कसून चौकशी केली. दोन  दिवसांपूर्वी सायंकाळी त्याचा मुलगा हा खेळण्यासाठी घराबाहेर जात असताना तो पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर  गोरेगाव पूर्व येथील एका नाल्यात  मुलाचा मृतदेह फेपून पळ काढल्याचे राणाने पोलिसांना सांगितले.

काही वर्षांपूर्वी रिंकीचे लग्न झाले होते. तिला एक मुलगादेखील होता. पती सोडून गेल्यावर तिने मुलालादेखील सोडले. रिंकी ही गर्भवती राहिल्यावर पंचायत बोलवण्यात आली. दुसऱया मुलाला जन्म दिल्यावर रिंकी ही राणाच्या प्रेमात पडली. ती राणासोबत मुंबईत आली. ते तिघे एकत्र राहू लागले. जन्माला आलेले ते मूल दुसऱया पतीकडून असल्याने राणाला आवडत नव्हते. त्यामुळे ते अनेकदा मुलाला बेदम मारहाण करायचे. प्रेमसंबंधामध्ये अडथळा येत असल्याने राणा आणि पिंकीने त्या मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवून ठेवला. तसेच मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार केली. मुलाला जखमा झाल्या होत्या असे तपासात समोर आले आहे.