
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात असलेल्या धारणी तालुक्यात चार खासगी डॉक्टरसह सरकारी रुग्णालयातील दोन डॉक्टर कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यासोबतच इतर 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याच्या माहितीला तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मेळघाटच्या आरोग्य खात्यात प्रचंड खळबळ उडाली असून धारणी पोलीस व तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी चौकशी सुरू केली आहे.
येथील खासगी डॉक्टरच्या स्वॅब 29 तारखेला घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. त्यात संबंधित खासगी डॉक्टर हा पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले. असे असतानाही संबंधित डॉक्टरने आज सकाळी पुन्हा आपले रुग्णालय सुरू करून रुग्णांवर औषधोपचार सुरू केला होता. याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मिळाल्यानंतर डॉक्टरला उपचार बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र तरीदेखील डॉक्टर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा स्थितीत प्रशासनाच्या संबंधित अधिकार्यांनी डॉक्टरांना समज देऊन दवाखाना बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित डॉक्टरांचा दवाखाना सील केला आहे.
खासगी डॉक्टरसह इतरही 3 डॉक्टर कोरोनाग्रस्त आहे. तसेच सरकारी दवाखाान्यात काम करणारे कुसूम कोट व कलमखार येथील वैद्यकीय अधिकारी सुद्धा कोरोनाग्रस्त आहेत. उल्लोखनिय म्हणजे डॉक्टरांसोबत धारणीतील काँग्रेसच्या एका जेष्ठ जिल्हा पदाधिकार्याला सुद्धा कोरोना झाल्याची माहिती आहे. खासगी दवाखाना उघडणार्या डॉक्टरांच्या संपर्कात आतापर्यंत किती जण आले याचा तपास आता प्रशासनाच्या वतीने सुरू झाला आहे. त्यामुळे धारणीसह तालुक्यातील इतर गावातही खासगी डॉक्टरांच्या संपर्कामुळे कोरोनाचा कहर वाढला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
































































