अभिनेता रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी मनोरंजनसृष्टीला पोरपं केलं. एक उत्तम अभिनेता, एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी या नेहमीच सर्व रसिक-प्रेक्षकांसोबत राहतील, पण त्यांच्या अभिनय कारकीर्दीतील काही आठवणी रमेश देव यांनी झी मराठीवरील ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमात शेअर केल्या. काही आठवडय़ांपूर्वीच अभिनेता रमेश देव यांनी ‘हे तर काहीच नाय’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीने सगळेच कलाकार भारावून गेले होते.

रमेश देव यांनी त्यांचा आणि अमिताभ बच्चन एका किस्सा शेअर केला. त्यांचे किस्से ऐकून सगळ्या उपस्थित कलाकारांच्या चेहऱयावर हसू उमटलं. वयाच्या 94 व्या वर्षीदेखील त्यांचा असलेला उत्साह आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून जातो. त्यांच्या या काही गोड आठवणी त्यांच्याचकडून ऐकण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता झी मराठीवर हा भाग प्रसारित होईल.