मुंबईच्या कुशीत थंडी विसावली! पुढील तीन दिवसांत पारा आणखी घसरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस हुलकावणी देणाऱया थंडीने अखेर मुंबईच्या कुशीत मुक्काम ठोकला आहे. रात्री-पहाटेसह दिवसाच्या तापमानातही घट होऊ लागली आहे. रविवारी पारा अचानक दोन अंशांनी खाली आल्याने मुंबईकरांनी सुट्टीचा दिवस सुखद गारव्यासोबत एन्जॉय केला. पुढील तीन दिवसांत तापमानात 3 ते 4 अंशांची घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, रविवारी कुलाब्यात सरासरीपेक्षा जवळपास 2 अंशांनी कमी म्हणजेच 29.4 अंश इतके कमाल तापमान नोंदवले गेले. याचवेळी सांताक्रूझमध्येही कमाल तापमानात सरासरीपेक्षा 0.4 अंशांची घट झाली. त्यामुळे मुंबईकरांनी सुट्टीतील सायंकाळचा फेरफटका स्वेटर घालूनच कुटुंबियांसोबत एन्जॉय केला.

उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱयांमुळे मुंबईत थंडी मुक्कामी आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील तीन दिवसांत तापमानात 2 ते 4 अंशांची घट होईल, असा अंदाज कुलाबा येथील हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱयांनी वर्तवला आहे.