
फेसबुकची पैतृक कंपनी मेटाने दुसऱ्यांदा नोकर कपात केली आहे. मेटाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 11 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कंपनीवरून काढून टाकलं होतं. आता कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांपैकी एका महिला कर्मचाऱ्याने आपल्याला बाळंतपणाच्या रजेवर असताना काढून टाकल्याचा आरोप केला आहे.
मेटाने आपल्या 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यासाठी मेटाने दिलगिरीही व्यक्त केली आहे. तसंच, मेटाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी कंपनी 5 हजार अतिरिक्त पदांनाही बंद करण्याच्या विचारात आहे. या पदांवर आता भर्ती होणार नाही. हा निर्णय अतिशय कठीण होता. मात्र, बदललेल्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी असे कठोर निर्णय घ्यायची तयारी ठेवावी लागेल, असं झकरबर्गचं म्हणणं आहे.
दरम्यान, मेटाच्या एका महिला कर्मचाऱ्याने आपलं दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलं आहे. या महिला कर्मचाऱ्याचं नाव अँडी अलेन असं आहे. अँडीने एका पोस्टच्या माध्यमातून मेटाच्या या वागणुकीचा निषेध केला आहे. ती म्हणते की, आपण बाळंतपणाच्या रजेवर असताना आपल्याला नोकरीवरून काढलं गेलं. मेटासारखी कंपनी अशा प्रकारे आपल्या इतक्या कर्मचाऱ्यांना कसं काढून टाकू शकते? मार्क झकरबर्ग यांनी आपला पगार कापून घेतला आहे का? मला माहीत आहे की, अशा प्रकारचे बदल हे कोणत्याही व्यवसायात होतात आणि आपल्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. पण, अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्यानंतर मेटा त्याला कर्मचाऱ्यांची काळजी असल्याचा आव कसा काय आणू शकते? असं ती आपल्या पोस्टमधून म्हणाली आहे.
























































