मेट्रो 2019च्या अखेर धावणार; दिल्लीच्या लालफिती कारभाराने झाला उशीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

पश्चिम द्रूतगती महामार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग आणि लिंक रोडच्या ट्रफिक जाममधून सुटका करण्याची क्षमता असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो – 2 अ (डी.एन. नगर ते दहिसर) आणि मेट्रो – 7 (दहिसर ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ) या एलिवेटेड मेट्रो मार्गांवर पहिली मेट्रो धावणे आता 2019 च्या अखेर किंवा थेट 2020 मध्येच शक्य होणार आहे. या दोन्ही कॉरिडॉरसाठी डब्बे खरेदी करण्याचे कंत्राट देण्यात दिल्लीचा लालफितीशाही कारभार आड आल्याने 2019 च्या मध्यापर्यंत धावणारी मेट्रो आता आता 2020 च्या पुढे ढकलली गेली आहे.

मेट्रोच्या डब्यांच्या खरेदीची संपूर्ण प्रतिक्रिया दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे राबविले जात असून एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी मार्फत त्यासाठी निधी पुरविण्यात येत आहे. बीईएमएल कंपनीला मेट्रो – 2 अ (डी.एन. नगर ते दहीसर), मेट्रो – 7 (दहीसर ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे )आणि मेट्रो -2 ब (डी.एन.नगर -वांद्रे -मानखुर्द) या मार्गांसाठी 63 मेट्रो गाडयांचे 3,015 कोटीचे कंत्राट देण्यात आले आहे. बीईएमएल बरोबर सात कंपन्या शर्यतीत होत्या. सध्या 80 टक्के पायलिंगचे काम पूर्ण झाले असून ट्रॅक टाकण्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आम्ही 2019 च्या मध्यापर्यंत सिव्हील वर्क पूर्ण करून पहिली चाचणी घेण्याच्या तयारीत होतो. परंतु अचानक नवी दिल्लीत डब्यांचे टेंडर काढण्यात दिरंगाई झाल्याने चाचणी आता 2019 अखेर किंवा 2020 पर्यंत होऊ शकते अशी माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली आहे. एमएमआरडीएने ऑगस्ट 2018 मध्ये पुनर्निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. आणि अंतिम निविदा नोव्हेंबरमध्ये उघडण्यात आली आहे. जर टेंडर प्रक्रिया आधीच्या नियोजनाप्रमाणे गेल्यावर्षी पूर्ण झाली असती तर आम्ही आता कोणत्याही उपलब्ध पट्ट्यात पहिली ट्रायल घेण्याच्या स्थितीत असतो असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

summary- metro 2 and metro 7 will be run from end of 2019