मेट्रो-3च्या आरे-बीकेसी टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात, तरीही गारेगार प्रवासासाठी मुंबईकरांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3 मार्गाच्या आरे-बीकेसी पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) ट्रेनच्या नियमित चाचण्या होत आहेत. त्यामुळे लवकरच मेट्रोचा गारेगार प्रवास अनुभवता येईल असे वाटत असेल तर तो भ्रम ठरणार आहे. कारण अद्याप ओव्हरहेड कॉण्टॅक्ट सिस्टम (ओसीएस) आणि वीजजोडणीची काही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे मुंबईकरांना गारेगार प्रवासासाठी आणखी वर्षभर म्हणजे डिसेंबर 2023 अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समोर आले आहे.

एमएमआरसीएलने आज आरे ते बीकेसी हा मेट्रोचा पहिला टप्पा 2023 मध्ये मुंबईकराच्या सेवेत आणण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मेट्रो-3 मार्गासाठीच्या दुसऱ्या ट्रेनचे सर्व आठ डबे गुरुवारी शहरात दाखल झाले असून लवकरच ते एकत्र करून त्याची चाचणी घेतली जाईल. त्याचबरोबर पहिल्या ट्रेनने 1,500 किमीपेक्षा जास्त ट्रायल रनद्वारे सर्व डायनॅमिक आणि स्टॅटिक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. तरीही अद्याप ओव्हरहेड कॉण्टॅक्ट सिस्टमचे 47 टक्के, तर वीजजोडणीचे 12 टक्के काम बाकी आहे. ते पूर्ण करून सर्व अंतिम चाचण्या पूर्ण होण्यास आठ-दहा महिने लागणार आहेत. त्यामुळे आरे-बीकेसी मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू होण्यास डिसेंबर उजडणार असल्याचे एमएमआरसीएलच्या एका अधिकाऱयाने सांगितले.