मेट्रोमुळे खासगी वाहतूक ३५ टक्क्यांनी घटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील मेट्रोच्या जाळ्यामुळे खासगी वाहतूक मोठय़ा प्रमाणावर कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. मुंबईसह राज्यात मेट्रोमुळे खासगी वाहतूक ३५ टक्क्यांनी कमी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त आयोजित ‘शाश्वत पायाभूत सुविधा’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे माजी कार्यकारी संचालक पॉल स्पेझ, जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ निकोलस स्ट्रेन उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू केली आहेत. मुंबई, नागपूर व पुणे या शहरांमध्ये मेट्रोची उभारणी, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळ आदी प्रकल्प सुरू केले आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. या महामार्गामुळे नागपूर हे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी जोडले जाईल. या मार्गावर २४ स्मार्ट सिटींची निर्मिती होणार आहे.

मुंबई-नागपूर महामार्ग वेगात

दरम्यान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेनिमित्त मुंबईत आलेले दक्षिण कोरियाचे उपअर्थमंत्री ह्युंग क्वान को यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेचे काम अत्यंत वेगाने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरियन शिष्टमंडळाला दिल्या. कोरियन कंपनी या मार्गाचे काम करणार आहे. कोरियन कंपनीचे काम व तंत्रज्ञान उत्तम आहे, पण कामात गती हवी. जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम त्वरित होण्यासाठी कोरियन तज्ञांनी पाहणी करावी असे मुख्यमंत्री म्हणाले.