‘फायझर’चे दुष्परिणाम वाढले; लस घेतल्यावर महिला डॉक्टरला पक्षाघाताचा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pfizer

कोरोनाच्या बदललेल्या स्वरुपामुळे ब्रिटनसह जगभरात चिंता वाढली आहे. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशात लसीकरणही सुरू झाले आहे. मात्र, फायझर लसीमुळे होणारे दुष्परिणाम वाढत असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटन, अमेरिका, फिनलँड, पोर्तुगालनंतर आता मोक्सिकोमध्येही फायझर या कोरोना लसीचे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

मेक्सिकोमध्ये एका महिला डॉक्टरला कोरोनावरील फायझरची लस देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या त्वजेवर पुरळ उठले आणि लाल चट्टे पडले. त्यानंतर त्या महिला डॉक्टरला पक्षाघाताचा धक्का बसला. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे फायझर लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

ब्रिटनमध्येही दोन आरोग्य सेवकांना फायझर लसीचे दुष्परिणाम दिसून आले होते. लस घेतल्यावर त्यांच्या शरीरावर लाल चट्टे पडले होते. त्रास वाढल्यावर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर पोर्तुगालमध्ये एका आरोग्य सेवकाला लस दिल्यानंतर 48 तासातच त्याचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, ब्रिटनसह इतर देशातही फायझर लस दिल्यानंतर अनेकांना त्रास होत असल्याचे दिसून आले आहे.

मेक्सिकोमध्ये महिला डॉक्टरला कोरोनाची लस दिल्यानंतर अर्ध्या तासातच महिलेच्या शरीरावर लाल चट्टे पडू लागले. त्यानंतर शरीर आखडत असल्याचे तिला जाणवू लागले. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत असल्याने तिला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा धक्का आला. त्यांच्या स्पाइनल कॉर्डला सूज असल्याने त्यावर उपचार करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. डॉक्टर कार्ला यांना अँटीबायोटिकची एलर्जी असल्याने त्यांच्यावर लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी लसीच्या गंभीर दुष्परिणामांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर मेक्सिकोच्या आरोग्य विभागाने चौकशीला सुरुवात केली आहे. लस दिल्यानंतर डॉ. कार्ला यांना पक्षाघाताचा धक्का बसल्याची तक्रार मिळाली आहे. त्यांना आलेला पक्षाघाताचा धक्का आणि लसीचा काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

याआधी पोर्तुगालमध्ये फायझरची लस दिलेल्या एका आरोग्य सेवकाचा 48 तासातच मृत्यू झाला होता. लस घेतल्यावर त्यांना कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. मात्र 48 तासात त्यांचा अचानक मृत्यू झाला. लस देण्यापूर्वी त्यांची प्रकृती चांगली होती. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची एलर्जी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लसीच्या दुष्परिणामांमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे कटुंबीयांनी म्हटले आहे.

फिनलँडमध्येही लस दिलेल्या पाच जणांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसून आले होते. ब्रिटनमध्येही दोन आरोग्य सेवकांवर लसीचे गंभीर दुष्परिणाम झाले होते. त्यानंतर एलर्जी असणाऱ्यांना फायझर लस देऊ नये, अशी सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही लसीचे दुष्परिणाम दिसत असल्याने लसीचा प्रभाव आणि सुरक्षितता याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.