
वांद्रे येथील म्हाडा कार्यालयातील कार्यकारी अभियंता पदावर बदली होऊनही तेथील अधिकारी पदभार सोडण्यास तयार नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. अंधेरी येथील अनिल नामदेव राठोड यांनी याचिका केली आहे. म्हाडा, म्हाडा मुख्य अधिकारी, गृहनिर्माण विभाग व वसंत दामोदर धात्रक व हनुमंत धानुरे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
राठोड यांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांना वांद्रे येथील कार्यालयात कार्यकारी अभियंता म्हणून बदली देण्यात आली. तेथे कार्यरत असलेले धानुरे यांनी राठोड यांना पदभार देण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे धानुरे यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. तरीही तो अतिरिक्त पदभार सोडायला तयार नाहीत. त्यांच्याकडे बोरिवली येथील कार्यालयाचा मुख्य पदभार आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे राठोड हे जेथे कार्यरत होते तेथील पदभार त्यांनी धात्रक यांना दिला. तसेच धानुरे हे पदभार सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे राठोड यांच्याकडे कामच नाही. परिणामी त्यांना वेतन मिळत नाही.



























































