‘म्हाडा’ची 8205 घरांची लॉटरी; कल्याण, विरार, मीरा रोड आणि वेंगुर्ल्यात मिळणार ‘परवडणारे’ घर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हक्काच्या घरकुलाचे स्वप्न साकार करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य गरीब आणि मध्यमवर्गीयांना म्हाडाने गुड न्यूज दिली आहे. ठाणे, पालघर व सिंधुदुर्ग जिह्यात तब्बल 8 हजार 205 परवडणाऱया घरांसाठी 14 ऑक्टोबर 2021 रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8 हजार 205 घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील एकंदर घरांची मागणी व पुण्यातील घरांच्या लॉटरीचे यश पाहून म्हाडातर्फे आगामी काळात नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे, संभाजीनगरमध्ये 10 हजार घरे बांधण्यात येतील, असे आव्हाड म्हणाले.

शरद पवार केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

राज्यातील जनतेला जास्तीत जास्त घरे देण्याबरोबरच सर्वसामान्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार लवकरच नवी दिल्लीत केंद्रीय नगरविकासमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

बीडीडी प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. येत्या 3 वर्षांत वरळी बीडीडी चाळीचे चित्र बदललेले असेल, असा विश्वास गृहनिर्माणमंत्र्यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक घरे गरीबांसाठी

या लॉटरीतील घरांपैकी अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70 टक्के, तर अल्प उत्पन्न गटासाठी 27 टक्के म्हणजे या दोन्ही गटांसाठी मिळून 97 टक्के घरे उपलब्ध होतील.

अर्जाची किंमत व अनामत रक्कम

  • अर्जाची किंमत 560 रुपये.
  • अत्यल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 5 हजार रुपये.
  • अल्प उत्पन्न गटासाठी अनामत 10 हजार रुपये.
  • मध्यम उत्पन्न गटासाठी अनामत 15 हजार रुपये.
  • उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार रुपये

मासिक उत्पन्न मर्यादा – अत्यल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपयांपर्यंत.

  • अल्प उत्पन्न गटासाठी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत.
  • मध्यम उत्पन्न गटासाठी 50 हजार ते 75 हजारांपर्यंत.
  • उच्च उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपयांपेक्षा जास्त

घरे कोणत्या भागात

ठाणे जिल्हय़ातील शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर, मीरारोड येथे, पालघर जिह्यातील विरार बोळिंज व सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ला येथील घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल.

जाहिरात कधी प्रसिद्ध होणार

या लॉटरीची जाहिरात येत्या 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल तर 14 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येईल.