
संक्रमण शिबिरातील घुसखोरीला चाप लावण्यासाठी म्हाडातर्फे रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले, मात्र ज्या रहिवाशांचे हाताचे ठसे बायोमेट्रिक मशीनमध्ये व्यवस्थित उमटले नाहीत अशा सुमारे 3 हजार रहिवाशांचे म्हाडाकडून आता फेस रीडिंगद्वारे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येत आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण 34 ठिकाणी संक्रमण शिबिरे असून यात 20 हजार रहिवासी राहतात. शासन निर्णयानुसार, संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने म्हाडामार्फत गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत 17 हजारांहून अधिक रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, जवळपास 3 हजार रहिवाशांच्या हाताचे ठसे व्यवस्थित न उमटल्यामुळे या रहिवाशांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
असे होणार वर्गीकरण
‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासी ज्यांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. ‘ब’ प्रवर्गात असे रहिवासी ज्यांनी मुखत्यार पत्र किंवा तत्सम प्राधिकार पत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळय़ांचा हक्क घेतला आहे तसेच ‘क’ म्हणजे घुसखोर. ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळय़ांचा बेकायदेशीपणे ताबा घेतला आहे.
म्हाडापुढे पेच
सर्वेक्षणाला प्रतिसाद न देणाऱया रहिवाशांना घुसखोर ठरवून निष्कासनाची कारवाई केली जाईल, असा इशारा म्हाडाने दिला तरी अजूनही काही रहिवासी सर्वेक्षणाला प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वेक्षणाची टीम दाखल होताच घराला कुलूप लावून गायब होणाऱया रहिवाशांचा आकडा जवळपास हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या रहिवाशांचे सर्वेक्षण कसे पूर्ण करायचे असा म्हाडापुढे पेच आहे.





























































