म्हासुर्ली-झापाचीवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात, धामणी खोऱयातील पहिला प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात होणार पूर्ण क्षमतेने पाणीसाठा; पाणीटंचाई निकालात निघणार

स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने होरपळणाऱया धामणी खोऱयातील राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली परिसरातील वाडय़ावस्त्यांच्या कृषी हरितक्रांतीला संजीवनी देणाऱया म्हासुर्ली-झापाचीवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उर्वरित सर्व कामे पूर्ण करून यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण होणार आहे. परिणामी परिसरातील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार असून, धामणी खोऱयातील पहिलाच पाणी प्रकल्प पूर्णत्वाला जात असल्याने जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.

म्हासुर्ली व वाडय़ावस्तींमधील पाणीटंचाई लक्षात घेता, एखादा लघुपाटबंधारे प्रकल्प व्हावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून गेल्या 25 वर्षांपासून होत होती. परिणामी याची दखल शासनस्तरावर घेत दोन ठिकाणी खडक तपासणी केली होती. त्यापैकी भैरीचा दरा या ठिकाणी 990 घनमीटर क्षमतेच्या व चारशे एकर भीजक्षेत्र असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे या प्रकल्पाचे मूल्यही वाढले होते. विद्यमान शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करून 2015-16 मध्ये प्रत्यक्षात प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर काही काळ प्रकल्पाचे काम निधीअभावी तसेच सुधारित प्रशासकीय मान्यता व कोरोना संक्रमणामुळे रखडले होते. मात्र, आमदार आबिटकर यांच्या प्रयत्नामुळे गेली दोन वर्षे प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सध्या मातीकाम व बांधाची उंची पूर्ण झाली असून, दगडी पिचिंग, पाणी सोडण्याचे मुख्य गेट बसविणे आदी किरकोळ कामे तसेच सांडवा खोदाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. इतर कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून प्रकल्पात पाणी अडविण्याचे नियोजन संबंधित विभाग आणि ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे.

पाणीटंचाईने आमच्या अनेक पिढय़ा होरपळल्या आहेत. मात्र, झापाचीवाडी पाणी प्रकल्प आता पूर्ण होत आल्याने शेतकऱयांचे स्वप्न पूर्ण होणार असून, परिसराची हरितक्रांती होणार आहे.

– कृष्णात बरकाळे, शेतकरी.

प्रकल्पातील उर्वरित संपूर्ण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून यावर्षी पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे.

– सुरेश नलवडे, ठेकेदार.

काम पूर्णत्वाकडे गेले असून, पावसाळ्यात पाणी साठवणूक होणार आहे. नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱयांच्या थेट शेतापर्यंत पाणी पोहोचणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाचाही अवलंब केला जाणार असून, हा मॉडेल प्रकल्प बनविण्याचा मानस आहे. – बाळासाहेब आजगेकर, कार्यकारी अभियंता.

शेतकऱयांचे समाधान माझ्यासाठी आनंदायी!

झापाचीवाडी लघुप्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर म्हासुर्ली परिसरातील पाणीटंचाई कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱयाचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार असून, कष्टकऱयांच्या चेहऱयावरील समाधान माझ्यासाठी अधिक आनंददायी असेल, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

शेतकऱयांना थेट शेतात पाणी मिळणार

पीडीएन अर्थात नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱयांना थेट शेतात पाणी उपलब्ध होणार आहे. हेच या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्टय़ असून, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सुमारे 20 कोटी रुपये अंदाजित रक्कम खर्च होणार आहे. तर, प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे नदीपासून लांब असणाऱया म्हासुर्ली परिसरातील कोरडवाहू जमिनीत हरितक्रांती होणार असल्याने शेतकऱयांमधून आनंद व्यक्त होत आहे.