मी वेगळी; मी कलावती

65

>> अक्षदा बेंडले, ठाणे

छंद आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात आणि मलाही छंदाने जगायला शिकवले. आपल्या आवडीच्या गोष्टीत मन रमवले की, आयुष्य अगदी सुटसुटीत वाटते आणि त्यातूनच माझ्या वेगळेपणाचा अर्थ उमजतो. लहानपणापासून मला कलेची आवड. कोणतीही कला आत्मसात करायला आवडते. मग त्यात चित्रकला, तोरण, रुमाल, फ्लॉवर्स मेकिंग, ऍक्रेलिक रांगोळ्या, डेकोरेशन, मेहेंदी, ऍम्ब्रोयडरी, टॉयज्, क्ले पॉट बनविणे हे सगळे आवडते आणि हे सगळे प्रकार मी घरी करते. माहेरी असताना कलेसंबंधीचे छोटे छोटे कोर्स केले होते, पण त्याच सोबत नोकरीही करत होते. त्यानंतर लग्न झाले आणि नोकरी सोडूनच दिली, पण लग्नानंतर घरात फक्त बसून राहणे हे काही जमत नव्हते. पुन्हा नोकरी करण्याची इच्छा नव्हती.

नोकरीपेक्षा कलेत जास्त मन रमायचे, पण संसारात नवऱ्याला हातभार लावण्यासाठी आर्थिक मदत करणे योग्य वाटत होते. अशावेळी घरच्या घरी क्लासेस सुरू केले. दिवसेंदिवस क्लासेसचा पसारा वाढत होता. मुलं वाढल्यामुळे दिवसातून दोनवेळा क्लासेस घ्यायला लागले. त्यातून आमची आर्थिक गरज भागत होती, पण मन मात्र कलेकडेच धाव घेत होते. अशावेळी संसार, मुलगा, क्लासेस हे करता करता कलेला मात्र मला वेळ देता येत नव्हता, पण आता लवकरात लवकर घरातील कामे संपवून आवडीसाठी मी भरपूर वेळ देते. सगळ्याच गोष्टींचा कोर्स मी केलेला नाही. आज कोणतीही कला बघून मी आत्मसात करते. त्यामुळे कोणाच्याही घरी गेले की, त्यांच्याकडे काही कलात्मक असेल तर ते निरीक्षण करून घरी येऊन ते बनविण्याचा प्रयत्न करते. ऍक्रेलिक रांगोळ्या, राख्या, तोरण, कापसाची कंठी हे सगळं मी माझी हौस म्हणून करते आणि तसे लोकांना आवडले की, त्या ऑर्डर्स देतात.

आपली प्रतिक्रिया द्या