
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर शहरातील गुजराथीपुरा, कासारखेड, अकोला नाका, घन कचरा प्लॅन्ट आदी ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. ही घटना शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास घडली. ही माहिती अकोला वेधशाळेने दिली आहे. अकोला शहरापासून पश्चिमेस 19 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाळापूर शहरात हे 3 रिक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. याबाबत गुजराथीपुरा येथील माजी नगरसेवक प्रीतेश गुजराथी यांच्याकडून भूकंपाविषयी माहिती जाणून घेताना त्यांनी सांगितले की, भूकंपाचे सौम्य धक्के बसणे सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम घरांमध्ये गडगड असा आवाज ऐकू येऊ लागला. खिडक्यांच्या तावदानांचा तसेच दरवाजांचासुद्धा आवाज होऊ लागला अशी माहिती गुजराथीपुरा येथील माजी नगरसेवक प्रीतेश गुजराथी यांनी दिली.


























































