
सामना प्रतिनिधी । मुंबई
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (एव्हीएम) फेरफार केले जात असल्याची भीती सर्वत्र व्यक्त होत असल्याने निवडणूक आयोगाने अधिक सतर्क राहून योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केली आहे. देवरा यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे.
देशभरात अनेक ठिकाणाहून ईव्हीएममध्ये गडबडी होत असल्याच्या आरोपांची राळ उडालेली असताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आज आयोगाला पत्र पाठवून मशीनच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी केली आहे. देवरा यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांनाही पत्र पाठवले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना स्ट्राँग रूमबाहेर थांबण्याची परवानगी मिळावी, अशीही मागणीही त्यांनी केली आहे. स्ट्रॉंग रूमबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा अधिकार राजकीय पक्षांना द्यावा, अशी मागणीही देवरा यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.


























































