
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
न्यायालयीन कोठडीत म्हणजे हर्सूल जेलमध्ये असलेला एमआयएमचा मनपातील विरोधी पक्षनेता फेरोज खान मोईनोद्दीन खान यांचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी आज गुरुवारी फेटाळला.
शहरात उसळलेल्या दंगलीच्या काळात दीपक मन्नालाल जैस्वाल यांच्या बिअर बारच्या गोडाऊनमधील विदेशी मद्याच्या साठ्याची तोडफोड करून गोडाऊन आणि जैस्वाल यांचे घर पेटवून दिल्याच्या गुन्ह्यात फेरोजखान १५ मे रोजी पोलिसांना शरण आला होता. न्यायालयाने त्याला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी तर त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून फेरोजखान हर्सूल जेलमध्येच आहे.
फेरोजखान याच्या जामीन अर्जास विरोध करताना अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पेâरोजखान याने जमावाला भडकावले होते. या गुन्ह्यात फेरोजखानच्या सात साथीदारांना १७ मे रोजी अटक करण्यात आली असून त्याच्या तपासातही फेरोजनेच चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाले. त्याचे आणखी १४ साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेऊन अटक करावयाची आहे. मात्र, फेरोजखान याला जामीन दिल्यास तो त्यांना फरार होण्यास मदत करू शकतो. त्याने मुस्लिम तरुणांचे डोके भडकावून, कट रचून, दंगल घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले असून भविष्यातही दंगल घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दंगलीच्या काळात निरपराध नागरिकांचे जवळपास ७ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे. फेरोज व त्याच्या साथीदारांनी जनतेच्या मालमत्तेची तोडफोड आणि जाळपोळ करून लुटमार केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला माल, दारूच्या बाटल्या वगैरे हस्तगत करावयाच्या आहेत. फेरोजने भडकावल्यामुळे एका घरास आग लावण्यात आली, त्यात एका नागरिकाचा (बन्सीले यांचा) मृत्यू झालेला आहे. फेरोजला जामिनावर सोडल्यास पुन्हा मोठा दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो साक्षीrदारांवर दबाव टाकण्याची दाट शक्यता आहे. तपास प्राथमिक अवस्थेत आहे. त्यात अडथळा निर्माण होईल. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम तरुणांचे डोके भडकावून तो दंगे घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद अॅड. मुंडवाडकर यांनी केला. उभय युक्तिवादानंतर न्यायालयाने फेरोजखानचा जामीन अर्ज फेटाळला.

























































