सोमय्या… बिनशर्त लेखी माफी मागा! अन्यथा 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेते किरीट सोमय्या हे आपल्यावर करत असलेले आरोप तथ्यहीन असून राजकीय स्वार्थापोटी केले गेलेले आहेत. त्याबद्दल त्यांनी 72 तासांत बिनशर्त लेखी माफी मागावी अन्यथा 100 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा  दावा ठोकणार’, असा इशारा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज दिला. त्यासंदर्भात त्यांनी सोमय्या यांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

अनिल परब यांनी अॅड. सुषमा सिंग यांच्यामार्फत किरीट जयंतीलाल सोमय्या यांना नोटीस पाठवली आहे. सोमय्या यांचे सर्व आरोप अनिल परब यांनी फेटाळून लावले आहेत. सोमय्या हे मे 2021 पासून राजकीय सूडापोटी आणि वैयक्तिक आकसातून आपल्यावर मीडियासमोर विशेषकरून सोशल मीडियावरून आरोप करून परब यांची प्रतिमा मलिन करत आहेत. त्यांच्या आरोपांमुळे परब यांच्या वैयक्तिक व सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचली आहे असे या नोटीशीत म्हटले आहे.

दापोलीतील रिसॉर्टशी संबंध नाही

दापोलीमध्ये अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट उभारल्याचा सोमय्या यांचा आरोप चुकीचा आहे. साई रिसॉर्ट आणि सी काऊंच रिसॉर्ट अशी दोन नावेही त्यांनी ट्विटरवर दिली आहेत. या दोन्ही रिसॉर्टच्या बांधकामांशी परब यांचा संबंध नाही असे या नोटीशीमध्ये स्पष्ट केले आहे.

केवळ प्रसिद्धीसाठी बदनामी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ चौकशी सुरू आहे. तशीच अनिल परब यांचीही चौकशी होईल असे ट्विट करून सोमय्या हे परब यांची प्रतिष्ठा मलिन करत आहेत. एका ट्विटमध्ये त्यांनी परब यांचा ‘वसुली मंत्री’ असा उल्लेख केला. ‘वसुली’ हा शब्द खंडणीसाठी वापरला जातो. सोमय्यांचे अशा प्रकारचे आरोप हे परब यांची बदनामी करून निक्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आहेत, असे अॅड. सिंग यांनी नोटीशीत नमूद केले आहे.

  • नोटिशीत केलेल्या मागण्या
  • खोटे आणि बदनामीकारक आरोप ताबडतोब थांबवा सर्व बदनामीकारक ट्विट डिलिट करा
  • बिनशर्त लेखी माफी मागा
  • लेखी माफी वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करा तसेच ट्विटर हॅन्डलवरही नमूद करा.

 

किरीट सोमय्या हाजीर होSSS, अब्रुनुकसानीच्या खटल्यांत शिवडी कोर्टाचे समन्स

राज्याचे गृहनिर्माण मंत्री, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत वादग्रस्त विधान आणि राज्य गृहनिर्माण विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्य़ा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणींत भर पडली आहे. त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीच्या तीन खटल्यांत शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यानुसार सोमय्या यांना 22 सप्टेंबर, 5 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. सोमय्या यांनी केलेल्या विधानांमुळे तक्रारदारांची प्रतिमा मलिन झाली. त्यांच्याविरोधातील आरोप प्रथमदर्शनी सिद्ध होत आहेत, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.