श्री विठ्ठलाच्या दारात संदीपान भुमरेंची दादागिरी, 50 हून अधिक कार्यकर्त्यांना घडविले ‘व्हीआयपी’ दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाद, शिवीगाळ आणि दमबाजी यासाठी नेहमीच प्रसिद्धी झोतात असलेले मिंधे सरकार मधील वादग्रस्त मंत्री संदीपान भुमरे यांनी आज श्री विठ्ठलाच्या दारात आपल्या मस्तवालपणाचे दर्शन घडविले. आपल्या सोबत देवदर्शनासाठी आणलेल्या कार्यकर्त्यांना शॉर्टकट मार्गाने दर्शन देण्यासाठी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला. सामान्य भाविकांची दर्शन रांग रोखून धरण्यास मंदिर प्रशासनाला भाग पाडले आणि पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना व्हीव्हीआयपी दर्शन घडविले.

आषाढी वारीचा सोहळा पंढरीची वाट चालत आहे. वारीच्या गर्दीत दर्शनाला अधिकचा वेळ लागत असल्याने वारकरी सध्या गर्दी करीत आहेत. श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून दूर असलेल्या गोपाळपूर पर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत पन्नास हजारांहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी सात ते आठ तासांचा अवधी लागत आहे. रांगेत भाविकांची तोबा गर्दी असताना भूमरे हे आपल्या 50 हून अधिक कार्यकर्त्यांना घेऊन सकाळी 11 च्या सुमारास श्री विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेटवर हजर झाले.

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याने, पोलिसांनी त्याची चोख अंमलबजावणी सुरु केली आहे. व्हीव्हीआयपी म्हणून भुमरेंना मंदिरात जाण्यास परवानगी आहे. मात्र त्यांच्या सोबत त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने व्हीआयपी गेटवरील पोलीस कर्मचारी संकटात सापडले.

फटकळ आणि वादग्रस्त भूमरेंना व्हीआयपी दर्शन बंद आहे, तुम्ही काही मोजक्या लोकांना घेवून जावू शकता, असा मवाळ मेसेज पोलीस कर्मचाऱ्यांनी कानात दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत भुमरेंनी आपले कार्यकर्ते शॉर्टकट मार्गाने मंदिरामध्ये घुसवले. सामान्य भाविकांची दर्शन रांग बंद करुन भूमरे यांचे कार्यकर्ते घुसले.

मंदिरात दर्शन घेण्यापेक्षा देवसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी घाई केली. तेव्हा मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी या हुल्लड कार्यकर्त्यांना मज्जाव केला. मात्र काही वात्रट कार्यकर्त्यांनी कोणालाही न जुमानता फोटोसेशन करुन घेतले. प्रचंड उन्हात वयोवृध्द भाविक तासनतास उभे आहेत त्यांचा कसलाही विचार न करता भूमरेंनी श्री विठ्ठलाच्या साक्षीने केलेली दादागिरी आणि घुसखोरी दर्शन रांगेतील भाविकांना रुचली नाही.