किरकोळ वादातून तरुणाला झाडाला बांधले, नंतर त्याच्यासोबत केला भयंकर प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात एक अमानुष घटना समोर आली आहे, भांडणाच्या रागातून एका तरुणाला झाडाला लटकवून बेदम मारहाण करत विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

राम भरत श्रीवास्तव असे मृत इसमाचे नाव आहे. राम याचे गावातील निलेश आणि उमेश पाण्डेशी भांडण झाले होते. भांडणाच्या रागातून ही हत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रामची पत्नी सुरभी हिने दिलेल्या माहितीनुसार उमेश आणि निलेश पाण्डे हे दोघं गुरुवारी रात्री त्यांच्या घरात घुसले. त्यांनी रामला घरातून मारहाण करत बाहेर नेत झाडाला बांधले. त्यानंतर त्याला बेदम मारले. त्यानंतर त्याला पुन्हा घरात नेऊन बेदम मारून विष पाजले.

घरच्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मारणे सुरुच ठेवले. अखेर तो बेशुद्ध झाल्यावर दोघांनी पोबारा केला. त्याला बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तत्काळ त्याला अमेठीच्या सीएचसी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र त्याची अवस्था पाहून त्याला जिल्हा रुग्णालयात न्यायला सांगितले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी लखनौच्या ट्रामा सेंटरला न्यायला सांगितले. मात्र तिथे वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस याप्रकरणाची चौकशी करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके कारण समजेल.