
लातूर शहरातील अंजली नगर भागात एक मुलगा हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून तलवार जप्त केली. सदरील मुलगा हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अंजली नगर परिसरात एक युवक हातात तलवार घेऊन फिरत आहे. त्यावरून सदर पथकाने अंजली नगर परिसरातून सदर युवकास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्या युवकाकडे एक लोखंडी तलवार मिळून आली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो अल्पवयीन असल्याचे आढळल्याने सदरच्या विधीसंघर्ष बालकास त्याचे पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 465/2022 कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यास आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश गळगट्टे, पोलीस अमलदार विलास फुलारी, संजय कांबळे, मुन्ना पठाण, बळीराम देमगुंडे, उस्मान मोमीन, रमेश नामदास यांनी केली आहे.






























































