
खंडणी उकळण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी 10 वर्षांच्या एका मुलाचं अपहरण करून त्याची हत्या केल्याचं वृत्त आहे. गंभीर म्हणजे त्यातील आरोपींचं वय 12 आणि 17 वर्षं इतकं असल्याची माहिती मिळत आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फरहान असं या पीडित मुलाचं नाव आहे. फरहानचं कुटुंब नवी दिल्लीतील श्रीराम कॉलनीत राहतं. त्याच्या घराजवळच एक मशीद आहे. फरहान त्याच मशिदीत कुराणाचा अभ्यास करण्यासाठी जत असे. गुरुवारी संध्याकाळी फरहान असाच अभ्यासासाठी मशिदीत गेला होता. पण, तिथून परत आलाच नाही. बराच काळ शोधाशोध केल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
पोलिसांनी सीसीटीव्हीत शोधल्यानंतर फरहान हा मशिदीत गेल्यानंतर परतलेला दिसलाच नाही. मग पोलिसांनी मशिदीत शोध घेतला तेव्हा मशिदीच्या छतावर त्याचा मृतदेह आढळला. त्याला दोन अल्पवयीन मुलांसोबत शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी फरहान त्यांच्यासोबत मोमोज खायला आला होता आणि तिथून निघून गेला असं सांगितलं. मात्र, सीसीटीव्हीमध्ये ते दोघेही मशिदीबाहेर पडल्याचं दिसत होतं आणि त्यांच्यासोबत फरहान नव्हता.
याचा संशय आल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली, तेव्हा या दोघांनीही त्याची हत्या केल्याचं कबूल केलं. गुरुवारी संध्याकाळी या दोघांनी मोमोज मागवले आणि मशिदीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन खाल्ले. त्यानंतर या दोघांनी फरहानला मशिदीच्या छतावर घेऊन गेले. तिथे फरहानचा गळा घोटून त्यांनी त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह मशिदीच्या छतावरच टाकली. त्याच्यावर रेतीच्या गोण्या ठेवून दिल्या, जेणेकरून कुणालाही सहज दिसू नये.
10 दिवसांपूर्वीही या दोघांनी त्याला झोपेची गोळी देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो असफल ठरला होता. एक क्राईम सिरीयल पाहून त्यांनी हा कट रचला होता. त्याचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. त्या पैशातून त्यांना मौज करायची होती. मात्र, पहिला कट फसल्यानंतर त्यांनी दुसरा डाव आखला आणि त्यात फरहानचा बळी गेला.




























































