शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार, नराधम आरोपी फरार

1126

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे शुक्रवारी सायंकाळी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा नराधम फरार झाला आहे. पोलीस त्याच्या शोधात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर पिडीत मुलगी ही सुरेगाव (कोळपेवाडी) येथे एका शाळेत चौथीत शिक्षण घेत आहे. ती शुक्रवारी (13) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना संशयीत आरोपीने सदर मुलीला खोटी ओळख सांगून मी तुझ्या वडिलांचा भाऊ आहे, तुला घरी घेऊन जाण्यासाठी मला त्यांनी पाठवले आहे असे सांगून पीडितेला दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला शहाजापूर कोळगाव रोड शेजारी असलेल्या कालव्यालगतच्या निर्मनुष्य वस्तीत असलेल्या बंद खोलीचे कुलूप तोडून त्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीला पीडित मुलीने प्रतिकार केल्याने तिला बुक्क्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे मारण्याचा दम देत तिच्या वर अत्याचार केला.

दरम्यान मुलगी शाळा सुटल्यावर घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलीस व नातेवाईक यांनी शोधाशोध केली असता एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून एका अज्ञात व्यक्तीने सदर मुलीस मोटार सायकलवर बसवून घेऊन गेल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर मुलीचे अपहरण झाले आहे, याची खात्री पोलिसांसह सर्वांना पटली. त्यानुसार पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या तीन पथकांच्या तुकड्या कोपरगावच्या दिशेने नगर येथून रवाना करण्यात आल्या. तर कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चौथे पथक आरोपीसह मुलीचा शोध घेण्यासाठी तालुका व परिसरात रवाना झाले.

पोलीस अधिकाऱ्यांसह 34 कर्मचाऱ्यांचा ताफा आरोपीच्या मागावर होता. रात्रभर पोलीस व नातेवाईक यांनी शोध घेऊनही मुलगी अथवा आरोपी सापडला नाही. मात्र पहाटेच्या दरम्यान शाळेचे मुख्याध्यापक, दोन गावाचे पोलीस पाटील यांना एक मोटार सायकल बेवारस अवस्थेत मिळून आली. त्यावर पीडित मुलीला आरोपीने सुरेगाव येथील कालव्याजवळ एका अज्ञात व्यक्तीच्या मोटार सायकलवर बसवून सोडून दिले. पीडिता मोतीनगर येथील नातेवाईकंच्या घरी गेली. त्यानंतर पुढील धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी अपहरण झालेली मुलगी व सापडलेली गाडी याची सखोल चौकशी केली असता मोटर सायकल क्र. एम एच 41 3033 ही गाडी शहजापूर येथील गणेश गोपीनाथ शिंदे यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर गाडी उसाचे वाढे आणण्यासाठी पाथर्डी येथील उस तोड कामगार अमोल बाबुराव निमसे याने घेऊन गेल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता त्यानेच मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. मात्र तो फरार असल्याने पोलिसांनी गुप्तता बाळगली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या