अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 60 वर्षांच्या नराधमाला दहा वर्षांची सक्तमजुरी, विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय!

 बिहारमधून गोवंडी येथील आत्येबहिणीकडे राहण्यास आलेल्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱया 60 वर्षांच्या नराधमाला विशेष ‘पोक्सो’ न्यायालयाने 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. मोहम्मद रईस अब्दुल हमीद कुरेशी असे दोषीचे नाव आहे. न्यायाधीश सीमा जाधव यांनी ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम 6 अन्वये कुरेशीला दोषी ठरवले. तसेच त्याला 20 हजारांचा दंडही ठोठावला आहे.

कुरेशीने जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून पीडित मुलीला गर्भधारणा झाली होती. एप्रिल 2016 मध्ये पीडित मुलगी ही बैंगणवाडी-गोवंडी येथील आत्येबहिणीकडे राहण्यास आली होती. कुरेशी हा पीडितेच्या आत्येबहिणीचा पती आहे. त्याने पत्नी घराबाहेर गेल्यानंतर पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. यावेळी घडलेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याचे बजावत आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही त्याने अनेकदा लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने पोलीस तक्रारीत केला. त्याआधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कुरेशीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात विशेष सरकारी वकील वीणा शेलार यांनी आरोपी कुरेशीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. त्यातून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश सीमा जाधव यांनी कुरेशीला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.