
लखीमपूर खिरी इथे दोन दलित अल्पवयीन बहिणींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर यातील दोन आरोपींना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राहुल सिंग यांनी चार जणांना विविध कलमांखाली दोषी ठरवलं. पीडिता या दलित समुदायातील होत्या. त्या एकमेकींच्या सख्ख्या बहिणी होत्या. त्यांचे मृतदेह निघासन या गावातील उसाच्या शेताजवळील झाडावर लटकवलेल्या स्थितीत आढळले होते.
या प्रकरणी सोमवारी न्यायालयाने सुनील आणि जुनैद या दोन मुख्य आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या 363, 376 अ, 302, 323 या कलमांतर्गत दोषी मानलं. त्याखेरीज पोक्सो कायद्यातील लागू असलेल्या विविध कलमांतर्गत ठपका ठेवून या दोघांना जन्मठेप आणि प्रत्येकी 46 हजार रुपये दंड ठोठावला. तसंच, सुनील उर्फ छोटू आणि अन्य एकाला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.






























































