
बिहारच्या वैशाली येथील सोनपूर विभागातील हाजीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला आहे. कारण पवन एक्सप्रेस तुटलेल्या चाकावर सुमारे 35 किमी धावली. या तुटलेल्या चाकाचा आवाज ऐकू आल्याने प्रवाशांनी सतर्कता दाखवत चेन ओढून ट्रेन थांबवली. पवन एक्स्प्रेसच्या S11 डब्याच्या एका चाकाचा वरचा भाग तुटला. यामुळे ट्रेनच्या डब्यामधून विचित्र आवाज येऊ लागला परिणामी बोगीतील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला, मात्र प्रवाशांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने मोठी दुर्घटना टळली.
तुटलेल्या चाकावरून ही ट्रेन मुझफ्फरपूर ते भगवानपूरपर्यंत सुमारे 35 किमी धावत राहिली. भगवानपूर स्थानकावर गाडी थांबल्यावर त्या बोगीतील प्रवासी खाली उतरले आणि त्यांना चाकाचा वरचा भाग तुटलेला दिसला. तितक्यात ट्रेनने हॉर्न वाजवला आणि पुढे जाण्यास सुरुवात केली, मात्र यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करून आणि चेन ओढून ट्रेन थांबवली. यानंतर लोहमार्ग पोलीस व इतर रेल्वेतील कर्मचाऱ्यांनी पोहोचून नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
एस-11 क्रमांकाच्या कोचमधील प्रवाशांनी सतर्कता दाखवली नसती तर रेल्वे रुळावरून घसरण्याचा धोका होता. या घटनेनंतर सुमारे साडेचार तास गाडी भगवानपूर स्थानकात उभी राहिली. रात्री 10.30 वाजेपर्यंत रेल्वे प्रवासी रेल्वेची बोगी बदलण्याची वाट पाहत बसले. काही तासांनंतर मुझफ्फरपूरहून दुसरी बोगी मागवण्यात आली आणि त्यानंतर रात्री 11.28 वाजता ट्रेन मुंबईकडे रवाना झाली. सुमारे 5 तास 20 मिनिटे उशिराने ट्रेन मुंबईकडे रवाना झाली. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षित रेल्वे प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.



























































