मिरज-परळी रेल्वेसेवा परभणीपर्यंत करावी, रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

221

सामना प्रतिनिधी । परभणी  

मिरज ते परळी आणि परळी ते मिरज ही रेल्वेसेवा परभणीपर्यंत करण्यात यावी, जेणे करुन लातूर येथे शिक्षणासाठी असलेल्या विद्याथ्र्यांची सोय तसेच पंढरपूरला परभणी जिल्ह्यातून जाणार्‍या भाविकांना या रेल्वे सेवेमुळे लाभ होणार आहे. त्यामुळे मिरज-परळी ही रेल्वेसेवा परभणीपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. सोलापूर विभागातील विभागीय प्रबंधकांनी मिरज-परळी रेल्वेला परभणीपर्यंत वाढविण्यासाठी तयारी दर्शविली असून मात्र नांदेड विभागातील अधिकारी ही रेल्वेसेवा घ्यायला तयार नाहीत.

गेल्या अनेक वर्षापासून परळीपर्यंतच असणारी मिरज-परळी ही रेल्वेगाडी परभणीपर्यंत करण्यात यावी. परभणी हे रेल्वे जंक्शनचे ठिकाण आहे. परभणीच्या रेल्वेस्थानकावर नांदेड-जालना जिल्ह्यातील प्रवाशी येत असतात. या प्रवाशांना पंढरपुरकडे जाणे सोयीचे होण्यासाठी ही गाडी अत्यंत महत्वाची आहे. परळीहून सकाळी ७.१५ वाजता मिरजकडे प्रस्थान करते. परळी ऐवजी परभणीपासून ही सेवा सुरु केल्यास परभणीच्या प्रवाशांना लातूर-पंढरपूरकडे जाण्याचा मार्ग सोयीस्कर होईल. नांदेड-परभणी-जालना येथील विद्यार्थी हे शिक्षणासाठी लातूर येथे मोठ्या प्रमाणात आहेत. लातूरला जाणारी कोणतीही गाडी लवकर नसल्यामुळे ही सेवा उपलब्ध केल्यानंतर प्रवाशांना सोयीचे होईल. त्यामुळे परळीपर्यंत येणारी मिरज गाडी ही परभणीपर्यंत करण्यात यावी. तसेच जालन्याहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही रेल्वेसेवा परभणीपासून केल्यास परभणी जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रवशांना मुंबईला जाणे सोयीचे होण्यासाठी ही सेवा परभणीपासून सुरु करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. मुंबई ते जालना ऐवजी मुंबई-परभणी अशी रेल्वेसेवा सुरु करावी, तसेच मिरज गाडी परभणीपर्यंत करण्यात यावी, अशा दोन मागण्या प्रवासी संघटनेचे हर्षद शहा, अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रवीण थानवी, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, अखिल भारतीय वारकर मंडळातर्फे बाळासाहेब मोहिते पाटील, सामाजिक नेते सुभाष जावळे, अनंता पांचाळ आदींनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून वारंवार मागणी करुनही ही रेल्वेसेवा सुरु करण्यात आली नाही. नवीन वर्षातील रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामध्ये हा बदल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या