पाकड्यांचे सैतानी कृत्य, जवानाचे अपहरण करून शिर छाटले !

14

सामना ऑनलाईन । जम्मू

पाकिस्तानातील नव्या इम्रान खान सरकारचे अभिनंदन करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार गुंतले असतानाच सीमेवर मात्र पाकिस्तान बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) अमानुष क्रौर्याची परिसीमा गाठली आहे. बीएसएफचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंदर कुमार यांची अपहरण करून हत्या केली. ‘बॅट’च्या क्रूरकर्म्यांनी जवान नरेंद्रर कुमार यांना गोळ्या घातल्या, शिर छाटले, त्यांचे डोळे काढले, हातपाय तोडले. या भयंकर हत्याकांडामुळे अवघा देश हादरला आहे. आतातरी मोदी सरकार पाकड्यांना कायमचा धडा शिकवणार का? आपल्या एका जवानाच्या बदल्यात पाकड्यांची दहा मुंडकी छाटणार का? असे सवाल देशवासीय विचारत आहेत.

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मंगळवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर रामगड सेक्टर येथे घडली. मंगळवारी सकाळी सीमा सुरक्षा दलाचे जवान (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवर गवत कापत होते. त्यावेळी पाकड्यांनी सकाळी 10.40 ला गोळीबार केला. बीएसएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात हेडकॉन्स्टेबल नरेंदर कुमार यांचा ठावठिकाणा लागला नाही. बीएसएफने तातडीने पाकिस्तानी रेंजर्सशी संपर्क साधला आणि आपला जवान बेपत्ता असल्याचे कळविले, पण पाक रेंजर्सने सहा तास काहीच प्रतिसाद दिला नाही. बीएसएफने जवान नरेंदर कुमार यांचा शोध सुरू केला. हे ऑपरेशन कठीण होते. या परिसरात पाणी साचून दलदल झाली आहे. अखेर मंगळवारी रात्री उशिरा जवान नरेंदर कुमार यांचा छिन्नविछिन्न मृतदेह मिळाला.

सोमवारी गृहमंत्र्यांनी कुंपण प्रकल्पाचे उद्घाटन केले होते
आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बीएसएफकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुंपण बसविण्याचे काम सुरू आहे. सोमवारीच जम्मू येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या ‘स्मार्ट फेन्स’प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. हे कुंपण बसविण्यासाठी सीमेवरील प्रचंड मोठे सारकांडा गवत कापावे लागणार आहे. हे गवत कापण्याचे काम सुरू असतानाच पाकडय़ांनी घात केला आणि जवान नरेंदर कुमार यांची अमानुष हत्या केली.

भाजपने काय म्हटले होते… एकच्या बदल्यात पाकची दहा मुंडकी छाटून आणा!
8 जानेवारी 2013 रोजी लान्सलायक हेमराज आणि लान्सनायक सुधाकर सिंह यांची पाकडय़ांनी अमानुष हत्या केली. शहीद हेमराज यांचे शिर घेऊन पाकडे गेले हेते. या घटनेने देशभर खळबळ उडाली होती. तत्कालीन ‘यूपीए’ सरकारला विरोधकांनी घेरले होते. लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला धडा शिकवा, जर हेमराजचे शिर मिळत नसेल तर दहा पाकिस्तानींची मुंडकी छाटून आणा, असे लोकसभेत म्हटले होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली होती.

 छिन्नविच्छिन्न मृतदेह
जवान नरेंदर कुमार हे बेपत्ता झाले नव्हते, तर पाकिस्तानी ‘बॅट’च्या टीमने त्यांची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह हिंदुस्थानच्या बाजूला फेकून दिला होता. रात्री उशिरा जवान नरेंदर यांचा मृतदेह मिळताच बीएसएफला धक्का बसला. शरीरात किमान तीन गोळ्या घुसल्या होत्या. धारदार शस्त्र्ाांनी त्यांचा गळा छाटला होता. क्रौर्याचा कळस म्हणजे जवान नरेंदर कुमार यांचे दोन्ही डोळे काढले होते. हालहाल करून बहादूर जवानाची पाकड्यांनी हत्या केली आहे.

 सीमेवर ‘हाय अलर्ट’चा इशारा
शहीद जवान नरेंदर कुमार यांच्या अमानुष हत्येनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्टचा इशारा दिला आहे. बीएसएफसह लष्करी जवानांची पेट्रोलिंग वाढविली आहे. पाकिस्तानला मूंहतोड जवाब दिला जाईल, असे बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हिंदुस्थानच्या डीजीएमओंनी पाकिस्तानी डीजीएमओला फोन करून या गंभीर घटनेची नोंद घ्या, असे सुनावले आहे.

‘बॅट’चा क्रूर इतिहास

– फेब्रुवारी 2000 दहशतवादी इलियास कश्मिरी याने नौशेरामध्ये सात हिंदुस्थानी जवानांची हत्या केली. 24 वर्षीय जवान भाऊसाहेब मारुती तळेकर यांची क्रूरपणे हत्या केली. जवान तळेकर यांचे शिर घेऊन इलियास पाकिस्तानात गेला.

– 1999 कारगील युद्धावेळी बहादूर कॅप्टन सौरभ कालिया यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. कॅप्टन कालिया यांचा मृतदेह हिंदुस्थानला दिला तेव्हा छिन्नविच्छिन होता.

– जून 2008 केल सेक्टरमध्ये बॅटने गोरखा रायफल्सच्या एका जवानाचे अपहरण करून शिरच्छेद केला.

– जानेवारी 2013 बॅटच्या क्रूरकर्म्यांनी लान्सनायक हेमराज आणि सुधाकर सिंह यांची अमानुषपणे हत्या केली. शहीद हेमराज यांचा शिरच्छेद केला होता.

– ऑक्टोबर 2017 माच्छील सेक्टर येथे हिंदुस्थानी लष्कराच्या चौकीवर हल्ला करून एका जवानाची हत्या केली. सीमेनजीक मृतदेह छिन्नविच्छिन अवस्थेत मिळाला.
मे 2017 बीएसएफचे जवान नायब सुभेदार परमजित सिंग आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांची ‘बॅट’ने अमानुषपणे हत्या केली.

शारजात क्रिकेट अन् सीमेवर रक्ताचा सडा!
एकीकडे क्रिकेट खेळायचे आणि दुसरीकडे सीमेवर हिंदुस्थानी जवानांच्या रक्ताचा सडा पाडायचा, अशी दुतोंडी भूमिका घेणाऱया पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळूच नये, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती. कश्मीर सीमेवरून होणारी अतिरेक्यांची घुसखोरी, सीमेवर होणारा रक्तपात, दहशतवाद्यांना पाकिस्तानात मिळणारा राजाश्रय यामुळे हिंदुस्थानने पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

बुधवारी शारजात आशिया क्रिकेट स्पर्धा सुरू झाली. सलामीलाच हिंदुस्थान – पाकिस्तानची लढत लागली. एकीकडे क्रिकेट खेळले जात असताना दुसरीकडे सीमेवर मात्र हवालदार नरेंदर सिंग यांच्या बलिदानामुळे शोककळा पसरली होती. पाकिस्तानी ‘बॅट’ पथकाने केलेल्या भ्याड कृत्यामुळे सीमेवर तैनात जवानांच्या डोळय़ात सूडाचा अंगार पेटला असतानाच शारजात मात्र चौकार, षटकारांची आतषबाजी होत होती.

summary : Missing BSF jawan body found mutilated by Pakistan BAT team

आपली प्रतिक्रिया द्या