
सामना ऑनलाईन । मलकापूर
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीच्या अभय कटकमवार यांचे वाहन बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आले. मलकापूर पोलिसांनी घाटंजी तसेच अवधूतवाडी पोलिसांशी संपर्क साधून वाहनाबाबतची माहिती दिली. असे असले तरी कटकमवार कुटूंबीयांचा अद्यापही शोध पोलिसांना लागलाच नाही. नातेवाइकाच्या लग्नासाठी यवतमाळात गेलेल्या व्यापार्यांचे कुटुंब 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस या कुटुंबाचा शोध घेणार काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर कुटुंब नेमके कुठे आहे, हे शोध घेण्याचे आव्हान यवतमाळातील अवधूतवाडी पोलिसांसमोर उभे आहे.
मलकापूर येथील व्यापारी अभय कटकमवार (४२) हे त्यांची पत्नी शीतल, आई हिराबाई आणि दोन मुलींसह यवतमाळ येथे बुधवार 10 जुलै रोजी कार (क्र.एमएच २९ एआर ८१८२) ने लग्नासाठी गेले होते. मात्र, त्या दिवसापासून कुटुंब घाटंजीला परतले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली; परंतु त्यांचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी हतबल झालेले त्यांचे नातेवाईक विशाल नीलावार यांनी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. कटमकवार यांचे शहरातील मुख्य बाजारपेठेत अभय कृषी केंद्र व तिरुपती ज्वेलर्स असे दोन प्रतिष्ठान आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिकांशी त्यांची नाळ जुळली होती. जुने व्यापारी असल्याने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे रासायनिक खते, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकरी नियमित संपर्कात येत होते. सोन्याचे दागिने गहाण करून नगदी रक्कम मिळविण्यासाठी शेतकरी या प्रतिष्ठानात नियमित व्यवहार करायचे. तिरुपती ज्वेलर्समध्ये सामान्य माणसाला गुंतवणूक करून सोने खरेदी करता यावे, यासाठी महिनेवारी गुंतवणूक (भिसी) ची एक योजना सुरू असल्याचे सुध्दा बोलले जात आहे. दरम्यान, सदर कुटुंब गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असल्याने कटकमवार प्रतिष्ठानात व्यवहार करणार्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बेपत्ता असलेल्या कुटुंबाचे अजूनही धागेदोरे गवसले नाही. दरम्यान या प्रकरणी विशाल नीलावार यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील जमादार सुनील डोंगरे, रवींद्र दुधकोहळे यांनी तपास सुरू केला. अशात कटकमवार यांचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-29-एआर-8182 बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बसस्थानक परिसरात पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आले. ते वाहन यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील असल्याची बाब उघडकीस आली., मलकापूर पोलिसांनी घाटंजी तसेच अवधूतवाडी पोलिसांशी संपर्क साधून वाहनाबाबतची माहिती दिली.
























































